Wednesday, September 2, 2009


अनेकदा विचारले तिला

पण तिच्याकडेही उत्तर नसे

मग तुकड्या तुकड्याने

माझे मलाच ते सुचत गेले

.... काहीतरी चुकत गेले

दिवस होते मंतरलेले

चिंब भिजण्याचे, बुडून जाण्याचे

आनंदात, एकमेकात

तरी मिठीत दोघांना काहीतरी खुपत गेले

.... काहीतरी चुकत गेले

दिवस होते धागे विणण्याचे

रेशमाचे, जरतारीचे

आयुष्यांना एकमेकात गुंफण्याचे

वस्त्र गुंफता गुंफताच कुठेतरी विरत गेले

.... काहीतरी चुकत गेले

दिवस होते उमेदीचे

चिवचिवत काड्या जमवण्याचे

घरटे बांधण्याचे

कळस गाठण्याआधीच घर जरा खचत गेले

.... काहीतरी चुकत गेले

काय घडले, कोण चुकले ?

पडत मात्र गेली शकले

मौनाचे वास्तव्य ओठांवरती वाढत गेले

अन् पाणी हळूहळू डोळ्यांमध्ये भरत गेले

.... काहीतरी चुकत गेले

.

--

रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.

No comments:

Post a Comment